वृत्तनिवेदीका दिपाली केळकर यांनी गुंफले शारदीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प…
अमळनेर :- शब्द हे जीवनाच प्रमुख सत्य असून प्रत्येक शब्दाला व्यक्तिमत्त्व असते.शब्द नसतील तर कल्पना देखील करता येणार नाही.मौनातून देखील संवाद साधता येतो एवढे शब्द महत्वाचे असतात असे प्रसिद्ध वृत्तनिवेदीका, निरुपणकार, सूत्रसंचालिका दिपाली केळकर यांनी अमळनेर येथील शारदीय व्याख्यानमालेच्या तिसरे पुष्प गुंफतांना सांगितले. शब्दांच्या जावे गावा या विषयावर त्या बोलत होत्या.
मराठी वाङमय मंडळ आणि कै आबासाहेब र का केले वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शारदीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. सदस्या जयश्री पाटील तर अध्यक्षस्थानी मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.शाम पवार यांनी करून दिला.
दिपाली केळकर पुढे म्हणाल्या की, अमळनेर ही शब्दांची सांस्कृतिक राजधानी असल्याने येथील लोकांना शब्दांची चांगली ओळख आहे.रसिकता आणि अगत्यशीलता म्हणजे अमळनेर. संवादाला शब्दांची गरज असतेच असे नाही.स्पर्शातून संवाद साधला जातो.जगण्याशी शब्दांचा अतूट नाते आहे.शब्द आपल्या रोजच्या वापरातल्या संवादातून भेटतात.जगातल्या कुणाशीही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलू शकलो असलो तरी थेट संवाद कमी होत चालला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी पुढे सांगितले की, शब्दांचा वापर जाणीवपूर्वक झाला पाहिजे.शब्दांचा झिम्मा म्हणजे कविता.शब्द जोडणारे असतात तसे तोडणारे देखील असतात.शब्दांनी इतिहास घडवला जातो.शब्दात अभिमानापेक्षा आर्जव असला पाहिजे. माणसाचे स्वभाव असतात तसेच शब्दांचे देखील स्वभाव असतात.शब्दांना नशीब असल्याचे दाखले त्यांनी दिले. शब्द खोडा घालणारी असतात, वाट चुकणारी शब्द असतात, शब्द प्रेमात पाडणारी असतात, शब्द वेदनाशामक असतात, शब्द आनंदचक्षु असतात, सुखाची व्याख्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत जाते.शब्द सोबत असले की सुख कायम सोबत असते, असे केळकर यांनी सांगितले.अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी तर आभार प्रा.शाम पवार यांनी मानले.