
आर के नगर भागातील घटना, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील पावणे सात लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना दिनांक २० रोजी सकाळी सहा वाजता आर के नगर भागात उघडकीस आली.

शहरातील आर के नगर भागातील भटू दौलत पाटील हे अधूनमधून शेती करण्यासाठी आपल्या मूळ वासरे गावी जात असतात. १५ पासून ते वासरे येथे गेले होते. २० रोजी सकाळी शेजाऱ्याने फोन करून सांगितले की, घराचे कुलूप तोडलेले आहे. त्यांनी अमळनेर येऊन पाहिले असता घरातील लॉकर व कपाटाचे कुलुपही तोडलेले दिसले घरातील ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४ लाख ७० हजार रुपये रोख असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.




