
तालुक्यात विविध ३४ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात…
अमळनेर:- शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीला ३० सप्टेंबर पर्यंत दिलेली स्थगिती उठवल्याने अमळनेर तालुक्यात विविध ३४ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसीची, राजमाता जिजाऊ सूतगिरणी, खान्देश शिक्षण मंडळ, शिक्षक शिक्षकेतर पतपेढी आणि पू. सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतपेढी आदी मोठ्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापैकी राजमाता जिजाऊ सूतगिरणी माजी आमदार शिरीष चौधरी यांची असून त्यांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. ही निवडणूक प्रादेशिक वस्त्रोद्योग मुंबई यांच्या मार्फत घेतली जात आहे. यात फक्त ५७ मतदार आहेत. तर गेल्या दोन वर्षांपासून मुदत वाढत असल्याने पू सानेगुरुजी पतपेढीच्या देखील १ ऑक्टोबर अहर्ता दिनांकावर याद्या मागवण्यात आल्या आहेत. सानेगुरुजी पतपेढीचे जिल्हा कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे या पतपेढीसह एमआयडीसीच्या निवडणुका जिल्हा उपनिबंधक मार्फत घेतल्या जाणार आहेत.
यासोबतच आदर्श नागरी पतपेढी, महेश नागरी पतपेढी, धनलक्ष्मी नागरी पतपेढी तसेच गणेशा नागरी पतपेढी, एक पीक संरक्षक सोसायटी, २५ मजूर सोसायट्या आणि पाडळसरे विकासो यांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.



