
प्रश्नपत्रिकाच अपूर्ण तर परीक्षा कशी घेणार, छपाईचा खर्च कोण करणार ???
अमळनेर:- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तर्फे ‛स्टार्स’ प्रकल्पांतर्गत ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक चाचणी १ साठी अमळनेर तालुक्याला सुमारे १० हजार तर जिल्ह्याला सुमारे ९० हजार प्रश्नपत्रिका कमी आल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यावी असा प्रश्न शिक्षणाधिकारीसह शिक्षकांनाही पडला आहे.

ऑक्टोबर अखेर इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मराठी इंग्रजी आणि गणित या विषयांची संकलित मूल्यमापन परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना प्रश्न पत्रिका पुरवल्या जात आहेत मात्र त्या प्रश्न पत्रिका विद्यार्थी संख्येनुसार शाळांना पुरवल्या जात नसल्याने शाळांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
संकलित मूल्यमापन चाचणी एक साठी पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रातून मराठी गणित आणि इंग्रजी या विषयांच्या प्रश्न पत्रिका वाटप करण्यात आल्या मात्र शाळांच्या पटसंख्येनुसार प्रश्नपत्रिका मिळणे अपेक्षित असताना प्रत्येक शाळेला कमी प्रमाणात त्या देण्यात आल्या अनेक शाळांना तर इयत्ता चौथीच्या गणित विषयाच्या प्रश्न पत्रिकाच मिळाल्या नाहीत,तर उर्दू माध्यमांच्या प्रश्न पत्रिका तालुका स्तरावर अद्याप प्राप्तच झाल्या नसल्याचे उघड झाले आहे.
अमळनेर शहर आणि तालुक्यात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत सर्व माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणार विद्यार्थी संख्या ४१ हजार ४८३ इतकी आहे. पहिली आणि दुसरी ची ४ हजार संख्या वजा केली तर ३९ हजार विद्यार्थी इयत्ता तिसरी ते आठवी पर्यंत शिक्षण घेत आहेत. तिसरीच्या ११००, चौथी ३०००, पाचवी १६००, सहावी १७७५, सातवीसाठी १६०० आणि आठवी साठी १४५० प्रश्न पत्रिका कमी आल्याचे पत्र गटशिक्षणाधिकारी यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना पाठविले आहे. याचाच अर्थ १० हजार ५२५ प्रश्नपत्रिका तालुका स्तरावर कमी पाठवण्यात आल्या आहेत. आणि सर्वच तालुक्यातून कमी प्रश्नपत्रिका आल्याची ओरड झाली असून जिल्ह्यात सुमारे ९० हजार प्रश्नपत्रिका कमी आल्या आहेत. एक प्रश्नपत्रिका ८ पेज ची असून एका झेरॉक्स साठी कमीत कमी १२ रुपये खर्च येणार आहे, शासन शाळांना खर्चासाठी अनुदान देत नाही, झेरॉक्स चा खर्च कोण करणार ? असा प्रश्न आता उभा ठाकला आहे. एक प्रश्नपत्रिकासाठी सरासरी १२ रुपये तर दहा हजार प्रश्नपत्रिकांसाठी एक लाख २० हजार खर्च तालुक्यावर आणि जिल्ह्याचा विचार केला तर साधारणतः १० ते ११ लाख रुपये खर्च कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी सह मुख्याध्यापक, शिक्षक यांना कशाही पद्धतीने उपक्रम राबवा असे सांगितले जाते. त्यामुळे अध्ययन निष्पत्ती अथवा संपादणूक प्रामाणिक होईल का याबाबत शंका घेण्यासारखेच असेल.
याबाबत गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी जिल्हा स्तरावरून कमी प्रश्न पत्रिका आल्याने प्रत्येक शाळेला कमी प्रमाणात वाटप केल्या असून जिल्हा स्तरावर प्रश्न पत्रिकांची मागणी केली असून त्या प्राप्त झाल्यास शाळांना त्या वाटप केल्या जातील असे सांगितले.
तालुका स्तरावर कमी प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांनी मागणी पाठवली आहे. कुठे जास्त असतील त्या किंवा इतर ठिकाणाहुन प्रश्नपत्रिकाची व्यवस्था केली जाईल. असे जिल्हा शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले




