
दोन्ही गटांकडून परस्परांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील सबगव्हाण येथे बकरीचे शेड काढण्यावरून मारहाण व विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी मारवड पोलिसांत दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत.

योगेश पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीच्या प्लॉटवर राकेश पाटील याने बांधलेले बकरीचे शेड काढण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी नकार दिल्याने दिनांक ३० रोजी फिर्यादी योगेश याने ते शेड स्वतः काढण्यास सुरुवात केली असता राकेश ज्ञानेश्वर पाटील व ज्ञानेश्वर बन्सीलाल पाटील यांनी फिर्यादीस दगडाने मारले तसेच वंदनाबाई ज्ञानेश्वर पाटील हिने त्यास खड्ड्यात ढकलून दिले. त्यामुळे फिर्यादीस दुखापत झाली असून उपचार घेवून त्यांनी मारवड पोलीसात तिघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
तर वंदनाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, योगेश पाटील यांच्या शेतात बांधलेले बकरीचे शेड काढण्यास थोडा अवधी मागितला असता त्याला राग आल्याने तो स्वतः शेड काढू लागला. फिर्यादी पती व मुलासह त्याजागी गेली असता योगेश याने मुलगा राकेश व पती ज्ञानेश्वर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करू लागला. फिर्यादी वंदना बाईचा हाथ पकडुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दोन्ही फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ शरीफ पठाण व पोहेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.




