
प्रकल्पस्तरीय स्पर्धेत चार क्रीडा प्रकारात केली चमकदार कामगिरी…
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे बु. आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यानी प्रकल्पस्तरीय स्पर्धेत चार क्रीडा प्रकारात यश संपादन करत चमकदार कामगिरी केली आहे.

दि. २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा अर्थात एकलव्य क्रीडा महोत्सव चोपडा तालुक्यातील सत्रासेन येथे आयोजित करण्यात आला होता. सदर क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील पिंपळे बु येथील श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित, यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवून चमकदार कामगिरी केली आहे. यात १७ वर्षाच्या आतील हँडबॉल स्पर्धेत विजयी व कबड्डी स्पर्धेत उपविजयी ठरले. १९ वर्षाच्या आतील गटात हँडबॉल, व 4×400 रिले स्पर्धेत खेळाडू विजय संपादन केला.
तसेच ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेतही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेतून एकूण 32 खेळाडूंची नाशिक विभाग स्तरावर निवड करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेतील विजयी खेळाडूंना आदिवासी विकास विभाग, नाशिक येथील अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच अमळनेर बीट मधील खेळाडूंचा प्रामाणिकपणा, नियमांचे उल्लंघन न करणे, खेळाडूवृत्ती, सहकार्य वृत्ती, खेळ भावना, आदरभाव इ.गुणांच्या आधारे मान्यवरांच्या हस्ते फेअर प्ले अवॉर्ड देवून खेळाडूंना गौरविण्यात आले. सर्व खेळाडूंना उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्य प्रशिक्षक स्वप्निल एच.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच राहुल पाटील, दिपक नांद्रे यांचे सहकार्य लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा विद्या पाटील, संस्थेचे सचिव युवराज पाटील, संचालक ॲड. अभिजित पाटील, मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




