सप्ताहाचे यंदाचे ४२ वे वर्ष, परिसरातील भाविकांची असते गर्दी…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथील श्रीराम मंदिर संस्थान व श्रीराम व मुक्ताई भजनी मंडळ आणि ग्रामस्थांकडून सालाबादाप्रमाणे या वर्षी ही अश्विन कृष्ण षष्टी म्हणजेच शुक्रवारी दिनांक ३ नोव्हेंबर पासुन अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह प्रारंभ होईल तर अश्विन कृष्ण दशमी दिनांक १० नोव्हेंबर रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटप होउन हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होईल. कीर्तन सप्ताहाचे ४२ वे वर्ष असून परिसरातील या हरिनाम कीर्तन सप्ताहात भाविकांची मोठी उपस्थिती असते.
शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ नंतर मंत्रोच्चार व विधीवत पुजन अभिषेक करून विठ्ठल- रुक्मिणी मुर्ती स्थापित करून संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या प्रतिमासह श्रीराम सीता माता मूर्ती पूजन करून हरिनाम सप्ताहाची मांडनी होईल. यात दैनिक कार्यक्रम खालील प्रमाणे दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ८:३० ते १०:३० या वेळेत जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून किर्तनासाठी वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील नामवंत कीर्तनकार हजेरी लावून किर्तनाची सेवा देणार आहेत त्यात दिनांक ३ रोजी शुक्रवारी हभप खुशाल महाराज- पिंपळगावकर, शनिवारी हभप विशाल महाराज -बोरनारकर, रविवारी हभप देवगोपाल शास्त्री महाराज- आडगावकर, सोमवारी हभप लीलाधर महाराज ओझरकर, मंगळवारी हभप चेतन महाराज- मालेगावकर, बुधवारी ह भ प अमोल महाराज-आळंदीकर, गुरुवारी दुपारी ४ ते ६ पालखी सोहळा होऊन विठ्ठल रुक्मिणी मुर्त्यांची व गीता भागवत ग्रथांची गावभर मिरवणूक काढण्यात येईल व रात्री हभप दीनानाथ महाराज नाशिककर यांचे कीर्तन होऊन शुक्रवारी दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळास हभप राजेंद्र महाराज निंभोरेकर यांचे काल्याचे जाहिर कीर्तन होऊन १२ ते २ या वेळात महाप्रसाद वाटप होउन हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होईल. तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.