
दोन्ही गटातर्फे मारवड पोलीसात परस्परविरोधी तक्रारी…
अमळनेर:- तालुक्यातील हिंगोणे बु. येथे किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाली असून दोन्ही गटातर्फे मारवड पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.

प्रथम फिर्यादी रामकृष्ण पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा अमोल यास मोटारसायकलीचा धक्का लागल्याने गावातील रणजितसिंग राजपूत याच्याशी किरकोळ वाद झाला होता. मात्र त्यानंतर दिनांक १ रोजी रात्री ८ वाजता केदारसिंग राजपूत, रणजितसिंग राजपूत, वैभव राजपूत, विनय राजपूत, कल्याणसिंग राजपूत, बबलू राजपूत, धुडकु राजपूत, भूरा राजपूत, लखन राजपूत, पांडुरंग राजपूत यांनी घरी येत फिर्यादी व मुलगा अमोल यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. व मोटरसायकलखाली चिरडून मारू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दुसऱ्या गटातर्फे केदारसिंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १ रोजी दुपारी १२ वाजता गावठाण जागा सपाटीकरण करण्याच्या कारणावरून पुतण्या रणजितसिंग यास अमोल व रामकृष्ण यांनी शिवीगाळ करत दगड मारला. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रामकृष्ण पाटील त्याचा मुलगा अमोल व पत्नी वर्षाबाई पाटील हे फिर्यादीच्या घरी आले व आमच्या शेतालगत तुम्ही सपाटीकरण का करीत आहात अशी विचारणा करून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी व त्याच्या पत्नीस मारहाण करत त्यांच्या लहान मुलाला व दोघांना जिवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून मारवड पोलिसांत दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास हेकॉ सुनील आगोने हे करीत आहेत.




