
अमळगावात मतदानयंत्र पडले बंद, दीड तासांनी प्रक्रिया झाली सुरळीत…
अमळनेर:- तालुक्यातील तेरा गावांतील ग्रामपंचायतीसाठी काल सरासरी ७५.९० टक्के मतदान झाले. आज दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार असून उमेदवारांसह ग्रामस्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तालुक्यात १३ हजार ५०८ पुरुष मतदारांपैकी १० हजार ४७८ मतदान झाले. १२ हजार ८४५ स्त्री मतदारांपैकी ९ हजार ५२५ मतदान झाले. एकूण २६ हजार ३५३ पैकी २० हजर ३ मतदारांनी आपला हक्क बजावला. दिनांक ६ रोजी सकाळी दहा वाजेपासून तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ४ टेबल ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीच्या एकूण चार फेऱ्या होतील व त्यासाठी एकूण ३० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
अमळगाव येथे बंद पडले मतदान यंत्र…
अमळगाव येथे सरपंच पदासाठी सात उमेदवार तर प्रभाग १ साठी एकूण अकरा उमेदवार रिंगणात असल्याने दोन बॅलेट युनिट वापरण्यात आले आहेत. सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली तेव्हा एकच मतदान केले जात होते. दुसरे मतदान होत नसल्याने मतदारांसह मतदान कर्मचारी व अधिकारी गोंधळात पडले. कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केल्यानंतर ही यंत्रणा सुरू होत नव्हती. निवडणूक अधिकारी मनोज सोनार यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर मतदान यंत्र अमळनेरला पाठवण्यात आले. नवीन यंत्र आणण्यात आले. दरम्यानच्या काळात शेतात जाण्यापूर्वी मतदान करण्यासाठी आलेले महिला मजूर, शेतकरी वाट पाहून कंटाळले होते. आपली मजुरी बुडू नये म्हणून ते मतदान सोडून शेताकडे निघाले. तब्बल दीड तासानंतर ९ वाजून ५ मिनिटांनी पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.




