पाडळसरेची सुप्रमा अंतिम टप्प्यात, लिफ्ट योजनांसाठी मिळणार ७०० कोटी रुपये…
अमळनेर:- शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी ७७ कोटींचा बायपास डीपी रोड मंजूर झाला असून तालुक्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी ९ नद्या आणि नाल्यांवर पुलांजवळ रिचार्ज शाप्ट करण्यात येईल. हा महाराष्ट्रातील पायलट प्रकल्प असेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी बाजार समितीच्या कार्यक्रमात बोलताना दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वही तुला करण्यात आली. त्यावेळी मंत्री अनिल पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रिचार्ज शाफ्टच्या माध्यमातून नदी नाल्यात १०० फुटापर्यंत बोअर केले जातील. त्यामुळे वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरून भूजल पातळी वाढेल. पाडळसरे धरणाची सुप्रमा अंतिम टप्प्यात आणली आहे. अडवलेल्या पाण्याला उचलण्यासाठी लिफ्ट योजनेला ७०० कोटी रुपये मिळवण्यासाठी प्रयत्न आहेत. तसेच लवकरच आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन अमळनेर तालुक्यातील जे मंडळे पात्र ठरतील ते दुष्काळी जाहीर करण्यात येतील. प्रशासकीय इमारतीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या जागेत अमळनेर पंचायत समितीची भव्य इमारत आणण्याचा प्रयत्न सुरू असून भविष्यात एक किमी परिसरात सर्व इमारती असतील असेही मंत्री पाटील म्हणाले. तसेच तालुक्यात होत असलेल्या व होणार असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.