
शासकीय कार्यालयांना कालमर्यादेत दप्तरे शोधण्याचे निर्देश..
अमळनेर:- शासनाने आदेश देवून तातडीने कुणबी नोंदी शोधायला लावून त्याचा संख्यात्मक अहवाल मागवला असल्याने जिकडे तिकडे सरकारी कार्यालयात कर्मचारी ‛कुणबी’ नोंदी शोधण्यात व्यस्त झाले आहेत
शासनाने महसूल विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, तलाठी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, नगरपालिका, शिक्षण विभाग, ग्रामपंचायती व विविध शासकीय कार्यालयाना कालमर्यादा घालून दप्तरे शोधण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल कार्यालयातील रेकॉर्ड विभागाच्या काही कागदपत्रे वर्षानुवर्ष काढण्यात आलेले नाहीत. मात्र आता सर्वच दप्तर बाहेर काढण्यात आले आहे. कोतवालांची मदत घेतली जात आहे. यामुळे जुनी आणि जीर्ण झालेल्या कागदांचे तुकडे पडत आहेत. जेमतेम जोडलेली कागदाचे तुकडे विस्कळित झाल्याने काही नोंदी गहाळ होण्याचीही शक्यताही नाकारता येत नाही. परंतु यामुळे या विभागाची साफसफाई तरी होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात देखील सर्व खरेदी विक्री व्यवहाराची कागदपत्रे काढून बारीक बारीक नोंदी तपासल्या जात आहेत. नगरपालिकेत देखील सर्व रेकॉर्ड नोंदी तपासण्यात कर्मचारी मग्न झाले आहेत. जन्ममृत्यूच्या नोंदी, वारस हक्काच्या नोंदी, अभिलेख सारेच कागदे चाळण्यात येत आहेत. कोणीही नागरिक शासकीय कार्यालयात गेला की कर्मचारी कुठे असे विचारले की ते कुणबी नोंदी शोधत आहेत, असे उत्तर मिळते.
आजपावेतो महसूल विभागात २४ हजार ५४ नोंदी तपासून त्यापैकी १ हजार ८६५ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. शिक्षण विभागात २ लाख ५४ हजार ५८ पैकी ७ हजार १६४ नोंदी, दुय्यम निबंधक कार्यालयात २३ हजार ४३३ नोंदींपैकी फक्त ५, भूमिअभिलेख कार्यालयात ९ हजार ५०८ पैकी ४७ तर नगरपरिषदेत २ लाख १९ हजार ५०५ नोंदींपैकी १ हजार ४४ नोंदी कुणबी आढळून आल्या आहेत.




