
अमळनेर:- येथील सुप्रसिद्ध शहनाई वादक व गायक प्रबल गुरव उर्फ चिमु (वय ४३) यांचे ९ रोजी सकाळी ११ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पारंपरिक शहनाई वाद्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
प्रबल गुरव यांचे वडील वसंतराव गुरव हे सुप्रसिद्ध शहनाई वादक होते. राजस्थान, गुजरातसह विविध राज्यात महाराष्ट्रभर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्यासोबत प्रबल गुरव देखील सहभागी असल्याने ते देखील तरबेज झाले होते. ताज हॉटेलमधील सेलेब्रिटींच्या कार्यक्रमात देखील प्रबल यांनी आपली छाप निर्माण केली होती. प्रबल हे उत्कृष्ट गायक देखील होते. राज्यात मोजक्या शहनाई पार्टी शिल्लक राहिल्या आहेत. प्रबल गुरव यांच्या निधनाने शहनाई वाद्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची मुलगी अनोखी गुरव ही देखील उत्कृष्ट शास्त्रीय गायिका आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ वहिनी असा परिवार आहे.




