जिल्ह्यातील ६७ महसूली मंडळांचा ही समावेश :- मंत्री अनिल पाटील…
अमळनेर:- जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून यात अमळनेर तालुक्यातील सर्वच आठ मंडळांचा समावेश आहे. या भागात दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत, अशी माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
मंत्रालयातील वॉर रूम येथे काल मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.यावेळी या बैठकीला मंत्रीमंडळ उप समितीचे सदस्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपानराव भुमरे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधानसचिव सोनिया सेठी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, कृषी विभागाचे सचिव सुनिल चव्हाण, वित्त विभागाचे सहसचिव वि.र.दहिफळे, पाणीपुरवठा विभागाच्या उपसचिव वर्षा देशमुख, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जलसपंदा विभागाचे सहसचिव संजय टाटू यावेळी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून अमळनेर तालुक्यातील नगाव, अमळनेर, पातोंडा, भरवस, मारवड, अमळगाव, शिरूड, वावडे या मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून आगामी कालावधीतही दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेवून उर्वरीत भागासाठी निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.