मुडी प्र. डांगरी येथील घटना, वालखेडा येथील एकावर गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे तमाशात पोलिसाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे राहणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील मुडी प्र डांगरी येथे ९ रोजी रात्री गायमातेच्या यात्रेनिमित्त लोकनाट्य आयोजित करण्यात आले होते. १० रोजी पहाटे साडे बारा वाजता अचानक हुल्लडबाजी झाल्याने त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या मारवड पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल भरत ईशी, भरत गायकवाड, पोलीस पाटील केशवराव दगा पाटील यांनी लोकांना शांत करत घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी प्रदीप आनंदा शिरसाठ (रा वालखेडा ता. शिंदखेडा) याने भरत ईशी यांना शिवीगाळ केली व धक्काबुक्की करत खाली पाडले. गर्दी आणि गोंधळ बघता शिरसाळ्याचे पोलीस पाटील रामचंद्र चौधरी, कळंबुचे पोलीस पाटील जयसिंग राजपूत, मांडळचे सुरेश पाटील व मुडी येथील प्रणव पाटील, रवींद्र पाटील, अनिल भोई यांनी आवराआवर केली. त्यानंतरही प्रदीप शिरसाठ यांनी तुझा काटा काढतो म्हणत धमकी दिली. हेडकॉन्स्टेबल भरत ईशी यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे करीत आहेत. आरोपी प्रदीप शिरसाठ फरार झाला आहे.