आर्थिक मदत करून अनाथ लकी पाटील या चिमुरड्याला दिली जगण्याची नवी उमेद…
अमळनेर:- दोन महिन्यापूर्वी वडिलांनी आत्महत्या केली, महिन्याभरापूर्वी आईही अपघातात गेली. आता मोठ्या बहिणीचे लग्न ठरले, थोड्या दिवसांनी तीही सासरी जाणार, १४ वर्षांचा ‛लकी’ जीवनात एकटा पडला असता, मात्र ताडेपुरा येथील सामाजिक कार्यकर्त्यानी सोशल मीडियावर आवाहन करत लकीला आर्थिक मदत करून त्याच्या जीवनात दिवाळीचा आनंदाचा गोडवा भरला.
शहरातील ताडेपुरा भागातील शालीक पाटील हा मजुरी करून उदरनिर्वाह करीत असे. अमळनेरात उपजीविका होत नाही म्हणून तो पत्नी चित्रा, मुलगी व लहान मुलगा लकी याला घेऊन नाशिक येथे गेला होता. तेथे दोन महिन्यांपूर्वी शालीकने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्याची पत्नी मुलांना घेऊन अमळनेर ला आले. २ ऑक्टोबर रोजी चित्राबाई व लकी तिच्या आईला बघण्यासाठी नातेवाईकासोबत मोटरसायकलवर जात असताना मोटरसायकल उसाच्या मशीनवर धडकली आणि चित्राबाईचा जागीच मृत्यू झाला. त्यात लकीचा पाय मोडला. बापाचा आधार गेल्यानंतर आईचे ही छत्र हरपल्याने लकी अनलकी ठरला. लकीच्या काकांची परिस्थिती जेमतेम आणि मामाची ही परिस्थिती साधारणच असल्याने लकी आणि त्याची बहीण पोरके झाले. बहिणीचे लग्न ठरले आहे. काही दिवसात ती ही लग्न करून सासरी निघून जाणार. मात्र १४ वर्षाच्या लकीचे काय होणार ? हा प्रश्न समाजाला पडला. विद्यार्थ्यांप्रती आपुलकी असणारे शिक्षक चंद्रकांत कंखरे यांचे मन हेलावले, त्यांनी स्वतः पाच हजार रुपयांची मदत दिली. त्यांनी अनिल ठाकरे, विजय पाटील यांच्या मदतीने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले. अन प्रतिसाद मिळू लागला. सुमारे पन्नास हजार रुपयांची मदत गोळा झाली आणि ताडेपुरा वासीयांनी लकीच्या जीवनात दिवाळीचा गोडवा निर्माण केला. लकीला पुढे शिक्षणासाठी मामाकडे पाठवण्यात येणार आहे. ताडेपुरा येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या माणुसकीने लकीच्या जीवनाला दिशा मिळाली असून जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे.