
महिला व तिच्या अल्पवयीन मुलाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- लहान मुलांच्या भांडणावरून एका महिलेने व अल्पवयीन मुलाने २१ वर्षीय तरुणाला फायटरने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १६ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवर भांडारकर कंपाऊंड मध्ये घडली. कृष्णा गिरीश वर्मा वय २१ रा अनमोल शॉपी असे जखमींचे नाव असून तो खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १६ रोजी सायंकाळी लहान मुलांचे भांडण झाले आणि एक अल्पवयीन मुलगा कृष्णा वर्मा यांच्या घरी येऊन शिविगाळ करू लागला. त्यावेळी कृष्णाचे आजोबा कांतीलाल वर्मा यांनी लहान मुलांचे भांडण होतात, तू शिवीगाळ का करतो ? असे समजावत असताना त्या अल्पवयीन मुलाने आजोबा कांतीलाल वर्मा याना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. ही माहिती मिळताच कृष्णा वर्मा त्या अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांना गाऱ्हाणे सांगावेत म्हणून विचारपूस करीत असताना अल्पवयीन मुलाने त्याला स्वतःच्या घरात ओढून घेतले आणि फायटरने डोक्यावर, कपाळावर व डोळ्यावर जोरात मारहाण सुरू केली. लागलीच त्या बालकाच्या मुलाच्या आईने कृष्णाला खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. कृष्णाच्या काका काकूंनी त्याची सुटका केली. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला सुयश हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात जाऊन जबाब घेतल्यावरून महिला व तिचा अल्पवयीन मुलाविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर व पोलीस निरिक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली. घटना आरोपींच्या घरात झाल्याने पुरावे नष्ट होण्याची भीती असल्याने त्यांनी तातडीने फॉरेन्सिक प्रयोगशाळेचे अधिकारी बोलावून चाचणीसाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.

