बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि खाजगी लक्झरी बसेसमध्ये उसळली प्रचंड गर्दी…
अमळनेर:- भाऊबीजेला आलेल्या माहेरवाशिणी आणि दिवाळीला मूळ गावी आलेला नोकरवर्ग कामगार परतीच्या मार्गावर असल्याने बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि लक्झरी बसेस मध्ये प्रचंड गर्दी उसळली आहे.
दिवाळीच्या पूर्वी आणि सुरुवातीचे दोन तीन दिवस पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावतीकडून गावाकडे येणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. खाजगी बसेसला किमान १५०० रुपये तिकीट द्यावे लागत होते. तर त्या काळात गावाकडून मुंबई पुणे जाणाऱ्यांना अवघे ६०० रुपये तिकीट लागत होते. आता परतीचा प्रवास सुरु झाल्याने खाजगी बसेस इकडून तिकडे जाण्यासाठी १५०० ते १७०० रुपये भाडे घेत असल्याने लक्झरीचे भाडे परवडत नाही म्हणून प्रवासी एसटी, रेल्वेकडे वळत आहेत. मात्र एसटी, रेल्वे देखील फुल असून प्रवासी बसस्थानकावर रेंगाळताना दिसून येतात. आणि बस येताच त्यामागे धावतात व रुमाल, पिशवी वस्तू टाकून जागा मिळवण्यासाठी धडपड करीत आहेत. माहेरकडून मिळालेली भेट, वस्तू,अन्न धान्य आदी वस्तूंच्या जड पिशव्या आणि हातात लहान बाळ सांभाळताना महिलांची चांगलीच कसरत होत आहे.
प्रवासी वाढल्याने अमळनेर आगाराने बस फेऱ्या वाढवल्या आहेत. दिवाळीच्या चारच दिवसात अमळनेर आगाराचे उत्पन्न अपेक्षित २० लाखावरून ४० लाखापर्यंत वाढले आहे. अमळनेर आगाराने नाशिकसाठी ९ जादा बसेस सोडल्या आहेत. पुणे रातराणी २ जादा बसेस, मुंबई रातराणी एक जादा बस, सुरत ४ जादा बसेस, पुणे दिवसा ६ जादा बसेस तर चोपडा धुळे दिवसाला १२ फेऱ्या वाढवल्या आहेत. तर जळगावला ९ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. दररोज सरासरी अमळनेर आगाराची एस टी २० ते २३ हजार किमी चालते व ५ ते ६ लाख रुपये उत्पन्न मिळवत होती मात्र दिवाळीच्या चार दिवसात जादा बसेस सोडल्याने किलोमीटर आणि उत्पन्न देखील वाढले आहे.
प्रतिक्रिया:-
दिवाळीच्या चार दिवसात ४३ फेऱ्या वाढवून एसटीने १ लाख १२ हजार ७१५ किमी प्रवास केला असून एकूण ३९ लाख रुपये ८१ हजार ३६ रुपये इतके उत्पन्न मिळवले आहे. एसटीने प्रवाश्यांना गरजेप्रमाणे सुविधा दिल्या आहेत.
– इम्रान खान पठाण, आगार व्यवस्थापक, अमळनेर