
अनेकासांठी अशुभ असणारा तेरा तालुक्यासाठी ठरतोय लाभदायक…
अमळनेर:- युरोप खंडात १३ हा आकडा अशुभ मानला जातो परंतु तालुक्यातील संपूर्ण राजकारण शहरातील प्रभाग १३ मध्ये केंद्रीभूत झाले असून बहुतेक राजकारण्याची कर्मभूमी प्रभाग १३च आहे. त्यामुळे अनेकजण १३ नंबरचा आकडा अशुभ मानत असले तरी तालुक्यासाठी हितकारक ठरला आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सध्या जिल्हा बँक आणि दूध संघाचे संचालक आहेत. यापूर्वी ते बाजार समिती सभापती ,जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील माजी नगराध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य होत्या ते याच प्रभागात राहतात, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील मंत्री पदावर असताना याच प्रभागात राहायचे आज त्यांचे महिला महाविद्यालय याच १३ नंबर च्या प्रभागात असल्याने त्यांची शैक्षणिक कर्मभूमी आहेच. माजी आमदार डॉ बी एस पाटील यांचे संपर्क कार्यालय आणि निवासस्थान दत्त हौसिंग सोसायटी मध्ये होते. येथूनच तालुक्याच्या राजकारणाची सूत्रे हलायची. माजी आमदार स्मिता वाघ या देखील याच १३ नंबरच्या प्रभागात राहतात. माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांचे वास्तव्य जिप विश्रामगृहाच्या शेजारी होते. त्यांच्या राजभवन मधून विकासाची आणि राजकीय डावपेचांची आखणी होत होती. माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , माजी नगराध्यक्ष स्व सुरेश ललवाणी, माजी नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, माजी नगराध्यक्ष नाना चौधरी, माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर, अर्बन बँक माजी चेअरमन भरत ललवाणी, माजी चेअरमन अभिषेक पाटील या साऱ्यांचे वास्तव्य तसेच शेतकी संघ माजी चेअरमन संजय पुनाजी पाटील, माजी चेअरमन श्याम पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी, खान्देश शिक्षण मंडळ अध्यक्ष अनिल कदम, खान्देश शिक्षण मंडळ माजी चेअरमन व बाजार समिती संचालक अनिल शिंदे, वसुंधरा लांडगे, ठेंगा सोसायटी चेअरमन दशरथ लांडगे याच प्रभाग १३ मधील रहिवाशी आहेत. म्हणजे तालुक्यातील शैक्षणिक,सहकार क्षेत्रातील राजकारणाला बळ देणारा हा प्रभाग ठरला आहे.
एव्हढेच नव्हे तर साहित्य चळवळ चालवणारे मराठी वाङ्मय मंडळ अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, सानेगुरुजी वाचनालय अध्यक्ष दिलीप सोनवणे यांचेही वास्तव्य याच प्रभागात आहे. ग्रामीण राजकारणातील सात्री सरपंच महेंद्र बोरसे, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष तुषार बोरसे, शेतकी संघ माजी अध्यक्ष डॉ नारायण पाटील, माजी उपनगराध्यक्ष कल्याण पाटील , चित्रा पवार,एन डी पाटील, नगरसेविका चंद्रकलाबाई साळुंखे हे देखील प्रभाग १३ मधीलच रहिवासी आहेत, तर जेथून तालुक्यातील ग्रामीण विकास साधला जात असे त्या पस सभापतीचा बंगला याच प्रभागात येतो आज जरी बंद अवस्थेत असला तरी पूर्वी तेथून पंचायत समिती कारभार चालत असे. विधानसभेचे भावी उमेदवार प्रकाशभाई पाटील यांचे संपर्क कार्यालय देखील याच प्रभागात आहे. तर विविध शैक्षणिक संस्था, बाजार समिती, मराठा समाज कार्यालय, कृषी अधिकारी कार्यालय, विविध मोठी दवाखाने, बसस्थानक याच प्रभागात आहे. एकंदरीत प्रभाग १३ हा तालुक्यातील राजकारणाचा भक्कम पाया आहे. तालुक्याला नवी दिशा देणारा ठरला आहे.




