
अमळनेर:- विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, अंगणवाडी सेविकांना- तृतीय श्रेणी व मदतनीसांना चतुर्थश्रेणी लागु करण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा, दरमहा पेंशन योजना सुरू करा, मिनी अंगणवाडी केंद्राचे रुपांतरण मोठ्या अंगणवाडी केंद्रात करा, १०वी पास मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती, मोबाईल देणे अंगणवाडी सेविकांमधुन पर्यवेक्षिकाची भरती वयाची अट न ठेवता करण्यात यावी, प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, २०२३ची भाऊबीज व गणवेश दिवाळी अगोदर देण्यांत यावी, असे शासनाचे आदेश असताना देखील जळगाव -धुळे जिल्ह्यात बऱ्याच प्रकल्पांमध्ये अजुनही भाऊबीज व गणवेश मिळालेली नाही. मागील मागील २०२२ या वर्षाची भाऊबीज चाळीसगांव व मुक्ताईनगर प्रकल्पात सेविका व मदतनीसांना भाऊबीज मिळालेली नाही. त्यांना ताबडतोब देण्यात यावी, अशा मागण्यांसाठी ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. ४ डिसेंबर पासून अंगणवाडी केंद्र बंद राहतील, अंगणवाडी सेविकांनी कोणतीही माहिती प्रकल्प कार्यालयाला देऊ नये. प्रकल्प कार्यालयाच्या दडपणाखाली बळी पडू नये, असे आवाहन राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून जिल्हा पदाधिकारी भानुदास पाटील, जिल्हाध्यक्षा सुषमा चव्हाण यांनी लेखी निवेदनाद्वारे तसेच प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.




