
२५ दिवसांत फक्त १२ शेतकऱ्यांनी केली नोंदणी…
अमळनेर:- येथील धुळे रस्त्यावरील शेतकी संघाच्या जीन शासकीय शासकीय भरड धान्य खरेदीसाठी नाव नोंदणी करण्याची मुदत या महिनाअखेर ३० नोव्हेंबर अखेर संपत आली. तरी भरड धान्य नोंदणीस प्रतिसाद लाभला नाही. केवळ १२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
तालुक्यात यंदा पावसाअभावी धान्य उत्पादनात मोठी घट झाली असून कमी उत्पादन आल्याने भाववाढ झाली. मका सरासरी २२०० रुपये क्विंटल जात असल्याने शासकीय भावापेक्षा अधिक भाव खुल्या बाजारात मिळत असल्याने बाजार समितीत शेतकरी माल विक्री करत आहे. शासकीय हमीभाव २०९० असल्याने त्यात आद्रता तपासून भाव ठरविला जातो. आद्रता जास्त भरल्यास त्यात भाव कमी होतो. याशिवाय हमीभावापेक्षा २०० रुपये अधिक मिळत असल्याने मका सर्व बाजार समितीत विक्री होत आहे. केवळ ८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर ज्वारीचे ही उत्पादन घटले असून यंदा कमी पेरा असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्रीसाठी पसंती ठरली आहे. ज्वारीला हमीभाव ३१८० रुपये असला तरी रोख रक्कम हातात पडत नाही. तितकाच ३ हजारांपर्यंत भाव खुल्या बाजारात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. केंद्रात धान्य विक्रीनंतर धनादेश उशिरा मिळतो. त्यामुळे पैसे मोकळे होण्यास विलंब होत असल्याने केवळ ४ शेतकऱ्यांचीच नोंदणी झाली आहे. तर बाजरी विक्रीसाठी एकाही शेतकऱ्याने नाव नोंदणी केलेली नाही. यामुळे केवळ १२ शेतकरी आतापर्यंत नोंदणी झालेले आहेत. खुल्या बाजारात बाजरीचे भाव हमी भावाबरोबर २५०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. दरवर्षी शेतमाल विकताना विविध ठिकाणी होणारी शेतकऱ्याची अडवणूक, पिळवणूक रोखण्यासाठी शासनाने भरड धान्य खरेदी केंद्र हा पर्याय दिला आहे. शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी शासकीय भरड धान्य केंद्रावरच आणावे यासाठी नाव नोंदणी केली जाते. किचकट प्रक्रिया आणि प्रतीक्षा विक्रीपूर्वी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या निकषाप्रमाणे मका, ज्वारी, बाजरी हा शेतमाल १४ टक्क्याच्या आतील आर्द्रता असलेला शेतमाल विक्रीस आणावा. जसा खरेदीचा एसएमएस येईल त्याची प्रतीक्षा करणे. नंतर वाहन विक्री व मोजणीसाठी आणणे. उशिरा मिळणारा धनादेश अशा बाबी असतांना तुलनेत बाजार समितीत हमीभावाबरोबर भाव मिळत असल्याने झटपट माल विक्री करून शेतकऱ्यांचा हाती रोख पैसे यावेत यासाठी शासन खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.




