
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे ७२ कोटी रुपये अग्रिम रक्कम मिळणार…
अमळनेर:- ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीचे अपील महाराष्ट्र शासनाने फेटाळल्याने जळगाव जिल्ह्यातील कापूस पीक विम्याचा अडसर दूर झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. पावसाचा खंड पडल्याने शासनाने पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश दिले होते. नियमाप्रमाणे ही रक्कम ऑगस्ट महिन्यात मिळणे अपेक्षित होते. मात्र विमा कंपनीने शासनाचे आदेश धुडकावून फक्त मका, ज्वारी, उडीद मुग या कमी लागवड असलेल्या पिकांचा ४ कोटी विमा दिला होता. आणि कापूस विम्याबाबत आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. अपिलावर सुनावणीत शेतकरी प्रतिनिधी प्रा सुभाष पाटील, सुरेश पाटील यांनी विमा कंपनीचे मुद्दे खोडून काढले होते. विमा कंपनीचा दावा खोटा उघडकीस आल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विमा कंपनीचे अपील फेटाळले होते. विमा कंपनीने पुन्हा शासनाचे मुख्य सचिव अनुपकुमार यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यावर ३० रोजी सुनावणी झाली. या सुनावणीस आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी सहसंचालक मोहन वाघ हजर होते. शासनाने देखील विमा कंपनीचे अपील फेटाळल्याने सुमारे ७२ कोटी रुपये विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.




