शासनाची चूक माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आणली उघडकीस…
अमळनेर:- अतिवृष्टी झालेल्या मंडळाची नावे देखील दुष्काळ सदृश्य यादीत आल्याची शासनाची चूक माजी आमदार साहेबराव पाटील यांनी उघडकीस आणली आहे. यादी दुरुस्त करून या मंडळांना अतिवृष्टीचे लाभ मिळावेत, अशी मागणीही माजी आमदार पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे.
शासनाने पर्जन्याची तूट, उपलब्ध भूजल कमतरता, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पिकांची स्थिती पाहून राज्यातील १०२१ मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या यादीत पारोळा तालुक्यातील शेळावे, बहादरपूर, चोरवड या तीन मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी शासनाची यादी कशी चुकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी शासनाच्या व महावेधच्या पर्जन्यमानाचे आकडे सादर केले आहेत. पारोळा तालुक्यात शेळावे मंडळात जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरी ६१९.६ मिमी पाऊस अपेक्षित असताना त्या मंडळात ६५९.४० मिमी म्हणजे १०६ .४२ टक्के पाऊस पडला आहे. या मंडळात ६ जुलै, ८ व २१ सप्टेंबर रोजी ६५मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तसेच बहादरपूर मंडळात ६५९.३०मिमी म्हणजे १०५.११ टक्के पाऊस तर चोरवड मंडळात ६३२.९०मिमी म्हणजे १०२ टक्के पाऊस पडला आहे. या दोन्ही मंडळात देखील ७, ८ व २१ सप्टेंबर रोजी ६५ मिमीपेक्षा जास्त म्हणजे अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शासनाच्या चुकीच्या आदेशात दुरुस्ती करून या तिन्ही मंडळांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीतून वगळून त्यांना शासन निर्णयानुसार अतिवृष्टीची मदत मिळावी त्याचप्रमाणे २६ नोव्हेंबरच्या आकस्मिक पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर सरसकट तात्काळ मदत करावी अशीही मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.