
२५ ठिकाणी चावा घेतल्याने पडले ५० टाके, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी…
अमळनेर:- शहरातील गुरुकृपा कॉलनीतील एका सहा वर्षाच्या बालिकेवर पाच कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडून जखमी केल्याची घटना ८ रोजी सायंकाळी घडली आहे.
भाग्यश्री नितीन पवार (वय सहा) ही बालिका शेजाऱ्यांना बोलवायला गेली असता अचानक बाहेरील पाच कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. तिच्या हातापायांना विविध ठिकाणी चावा घेतला. आजूबाजूच्या नागरिकांनी तिला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. तिला तातडीने नर्मदा फाउंडेशनमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉ अनिल शिंदे व डॉ संदीप जोशी यांनी तिच्यावर उपचार केले. कुत्र्यांनी तिच्या अंगावर २० ते २५ ठिकाणी चावा घेतला आहे. तिला ५० टाके पडले आहेत. दरम्यान ह्या भागातील बालकाला चावा घेण्याची ही दुसरी घटना असून पालिकेने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.




