
बेशिस्त बसेस पार्किंगमुळे अपघात घडण्याची शक्यता…
अमळनेर:- येथील बस स्थानकाच्या आवारात बसेस अस्ताव्यस्त लागत असल्याने विद्यार्थी, महिला व वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत आणि याच संधीचा फायदा सोनसाखळी चोर घेत आहेत.
अमळनेर हे मध्यवर्ती बस स्थानक असल्याने येथे धुळे, शिरपूर, चोपडा, जळगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा, पुणे, मुंबई,सुरत,अकोला, शिंदखेडा , नंदुरबार यासह तालुक्यातील विविध खेड्यांवर बसेस जातात. प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते त्यात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि महिलांना ५० टक्के तिकिटात सवलत असल्यामुळे महिला तसेच वृद्ध प्रवाशांची मोठी संख्या वाढली आहे. सध्या लग्नसराई आणि शाळा महाविद्यालये सुरू असल्याने अमळनेर बस स्थानक नेहमीच गजबजलेले असते. मात्र या बस स्थानकावर बसेस या चालक आपल्या सोयीनुसार मिळेल त्या ठिकाणी उभ्या करतात. बस स्थानकातील नियोजित प्लॅटफॉर्मवर एकही बस लागत नसल्याने कंट्रोलरने बस लागल्याचे जाहीर केल्यास ती कुठे लागली आहे, ती शोधण्यास प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. यात महिलांना वृद्ध प्रवासी यांची हातातील सामान ओढत मोठी धावपळ उडते. मध्येच एखादी बस आगारात जाते किंवा बाहेर पडत असल्याने मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रवाश्यांच्या धावपळ आणि प्रत्येक बसजवळ गर्दी केल्याने सोनसाखळी चोर गैरफायदा घेतात. प्रत्येक ठरलेल्या फलाटावर बस लागल्यास तेच मोजके प्रवाशी बसजवळ जातील परिणामी गर्दी होणार नाही आणि प्रवाशी व त्यांचे साहित्य सुरक्षित राहील. त्यामुळे नियोजित प्लॅटफॉर्मवर बस लावण्याचे शिस्त चालकांना लावावी, अशी मागणी नागरिकांकडून केले जात आहे.
बससंदर्भात चौकशी खिडकीवर विचारपूस केली असता आता लागेल, येणार आहे,निघून गेली एवढे उत्तर देऊन मोकळे होतात. काही प्रवाशांवर खेकसण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना बसस्थानकावर फिरत रहावे लागते.
प्रतिक्रिया…
अमळनेर आगाराच्या बसेस शिस्तीत लागतात मात्र बाहेर आगाराच्या बसेस अस्ताव्यस्त लागतात त्यांना अनेकदा सांगूनही ऐकत नाहीत. एक स्वतंत्र कंट्रोलर शिस्त लावण्यासाठी नियुक्त करण्यात येईल.
– इम्रानखान पठाण, आगार व्यवस्थापक, अमळनेर




