
अमळनेर:- नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेंतर्गत पणन महासंघाच्या संस्थांकडून खरेदी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील तीन केंद्रांना परवानगी मिळाली आहे. त्यात अमळनेर ,धरणगाव आणि यावल केंद्राचा समावेश आहे.
नाफेड अंतर्गत तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ, एरंडोल शेतकरी संघाच्या धरणगाव केंद्रला व कोरपावली वि का सोसायटी च्या यावल केंद्राला परवानगी देण्यात आली असून शेतकऱ्यांची नावे नोंदणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी जी एन मगरे यांनी केले आहे.
खरीप पिकांचे भरड धान्याचा बाजार भाव हमी भावापेक्षा जास्त असल्याने ज्वारी, मका आणि बाजरीच्या शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. म्हणून शासनाने आता हमीभावापेक्षा बाजार भावाने खरेदी केल्यास शेतकऱ्यांना लाभ होईल. आणि व्यापाऱ्यांमध्ये चुरस निर्माण होईल व शेतकऱ्यांना फायदाच होईल. तुरीचा हमीभाव शासनाने ७ हजार रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. बाजारात मात्र तूर ८ हजार रुपयांपेक्षा जास्त भावाने खरेदी केली जात आहे. यापूर्वी शेतकऱ्यांची खरेदीसाठी नोंद झाली असेल तर त्याने इतर कागदपत्रे देण्याऐवजी फक्त पीक पेरा असलेला सात बारा उतारा जोडावा लागणार आहे. नवीन शेतकऱ्यांना मात्र आधार कार्ड, अचूक बँक खाते, आणि ऑनलाईन पीक पेरा असलेला उतारा जोडणे आवश्यक असेल.




