
श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी केशव शंखनाद पथकाला विशेष आमंत्रण…
अमळनेर:- अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अमळनेरचे सुपुत्र नितीन महाजन यांचे शंखवादक पथक सहभागी होणार आहे. महाजन यांच्या केशव शंखनाद पथकास अयोध्येतून विशेष निमंत्रण मिळाले आहे, सदर पथकाचे १११ वादक शरयूतीरी शंखनाद करणार आहेत.

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पुण्यातील शंखवादन करणाऱ्या केशव शंखनाद पथकाला अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे. २३ आणि २४ जानेवारी रोजी श्रीराम मंदिरासह अयोध्येतील विविध चौक आणि शरयू नदीच्या तीरावर होणाऱ्या आरतीवेळी ते शंखनाद करणार आहोत. लहान मुलांपासून ते ८० वर्षांपर्यंतचे वादक वादन करणार आहेत, अशी माहिती पथकाचे प्रमुख नितीन महाजन यांनी दिली आहे.
अखंड हिंदुस्थानातील पहिले शंखनाद पथक…
अमळनेर शहरातील माळीवाडा भागातील मूळचे रहिवासी असलेले नितीन गोकुळ महाजन पुण्यात स्थाईक असून तेथे आपल्या कौशल्यातून मोठे बस्तान त्यांनी बसविले आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे ते पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंयोजक या मोठ्या पदावर कार्यरत आहेत. पुणे व परिसरात राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठा जनसंपर्क त्यांचा असून एक आवड म्हणून केशव शंखनाद पथकाची निर्मिती त्यांनी स्वतः केली असून या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. संपूर्ण हिंदुस्थानमधील हे पहिले पथक असून लहान मुलांपासून ते ८० वर्षांपर्यंतचे शेकडो वादक त्यांचे सदस्य आहेत.यात अनेकांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे.एका ठिकाणी असलेल्या धार्मिक कार्यक्रमात केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या नजरेत हे शंखनाद पथक पडून त्यांना प्रचंड भावल्याने रामलल्लाच्या या सर्वाधिक मोठ्या महोत्सवाचे निमंत्रण महाजन यांच्या पथकास मिळाले आहे.या बहुमानाबद्दल नितीन महाजन यांचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल पाटील, माजी आ डॉ बी एस पाटील,माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आ स्मिता वाघ, माजी आ शिरीष चौधरी,खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे,जेष्ठ नेत्या ॲड ललिता पाटील, अमळनेर येथील क्षत्रिय माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष मनोहर महाजन यासह अमळनेर येथील सर्व समाजबांधव व मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.




