
नवमतदारांना नोंदणीसाठी नव्याने संधी देण्यात येणार…
अमळनेर:- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवमतदार नोंदणी, दुबार नावे तसेच त्यातील मतदान कार्डातील दुरुस्तीची कामे अमळनेर निवडणूक शाखेत युद्ध पातळीवर सुरू आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा क्षेत्रात ३ लाख १ हजार ३१ इतकी मतदारांची संख्या आहे. त्यात एक लाख ५५ हजार दोनशे ९३ पुरुष तर १ लाख ४५ हजार सातशे ३६ इतक्या स्त्री मतदार आहेत. तर इतर मतदारांची संख्या २ आहे. २ हजार डीएससी (डेमोग्राफीकल सिमीलर एन्ट्री) दुबार मतदार यादीतून २०४ दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत तर पीएससी (फोटो सिमीलर एन्ट्री) दुबार मतदार यादीच्या ८५८ पैकी ३४६ दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, तर नवमतदारांना नोंदणीसाठी नव्याने संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी आता २२ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
इतकेच नव्हे तर लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत तहसील आवारात मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यात मतदारांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर मतदान कसे करावे, याचे प्रात्यक्षिक दिले जात आहे. मतदाराने कोणाला मत दिले याची खात्री होण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीन या मतदान यंत्राला जोडण्यात आले आहे. त्यावर मतदाराला दिलेले मत त्याच उमेदवाराला मिळाले की नाही, याची खात्री करता येणार आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन विषयी असलेल्या शंका कुशंकाचे निरसन होणार आहे. त्यामुळे मतदारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमळनेर निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.




