
अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ येथील स्व.आबासाहेब अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टॅलेंट स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र टॅलेंट स्पर्धा परीक्षा संस्था, पुणे मार्फत दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय परीक्षा आयोजित केली जाते. या वर्षी देखील विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य विकसीत व्हावे, एकमेकांशी संवाद घडून सभोवती घडणाऱ्या घटना, सामान्य ज्ञान याची माहिती व्हावी तसेच त्यांच्या सर्वांगिण विकास होण्यासाठी स्व.आबासाहेब अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र टॅलेंट स्पर्धा परीक्षा संस्था यांच्यावतीने स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या परीक्षेत माध्यमिक शाळेतील प्रथम राजमुद्रा संजय मैराळे, द्वितीय समान गुण असलेले विद्यार्थी सोनल विलास पाटील, प्रणव गुणवंत पाटील, सृष्टी संजय पाटील, तृतीय भावेश किशोर चव्हाण यांनी यश मिळवले. सदर परीक्षेचे मूल्यांकन करत असतांना परीक्षकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांशी हितगुज करीत असतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रीका सोडवताना होणाऱ्या चुका दुरुस्त कराव्यात, त्या चुका पुढील परीक्षेत काटेकोरपणे टाळाव्यात. या परीक्षेत महाराष्ट्र टॅलेंट स्पर्धा परीक्षा जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून सागर कोळी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. शाळेने उस्फुर्त सहभाग घेतल्याबद्दल महाराष्ट्र टॅलेंटतर्फे शाळेस सन्मानचिन्ह ट्रॉफी देण्यात आली. यावेळी सागर कोळी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांना भविष्यात आपल्याला अशाच परीक्षांना सामोरे जायचे असल्याने आपण अभ्यासाबरोबर आपले सामान्य ज्ञान वृध्दिंगत करावे व यश संपादन करावे, असे मौल्यवान विचार मांडले आणि संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. अनिल बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सदर कार्यकम यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




