
पाणी मागण्यावरून वाद, दोन्ही आरोपींना पोलिसांनी केली अटक…
अमळनेर:- पाणी मागण्याच्या कारणावरून दोघांनी हॉटेल मालक, वेटरसह चार जणांवर चाकू हल्ला केल्याची घटना ६ रोजी सायंकाळी लोंढवे येथील सर्वज्ञ हॉटेलवर घडली.

हॉटेल मालक मनोहर काशिनाथ पाटील, पवन संतोष धनगर, योगेश पाटील, काळू भिल अशी जखमींची नावे आहेत. चौघांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात मनोहर पाटील याला पोटावर वार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जानवे येथील अजय मंगल पारधी व जगन्नाथ श्यामराव पारधी हे दोघे लोंढवे येथील सर्वज्ञ हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. पाणी मागण्यावरून त्यांचे वेटरशी वाद झाले आणि दोघांनी चाकूने वार सुरू केला. ही भानगड आवरायला आलेल्या मालकावर आणि इतर सहकाऱ्यांना देखील चाकू मारला. त्यात एकाला पोटावर मारल्याने त्याच्या आतड्या बाहेर आल्या, एकाला कमरेजवळ पोटावर मारल्याने किडनीला जखम झाली तर दोघांना पाठीवर लागले आहे. आरोपी तेथून पळून गेले. जमलेल्या लोकांनी १०८ ने जखमींना धुळे येथे हलवले. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विजय शिंदे, किशोर पाटील, रवी पाटील, दीपक माळी, शरद पाटील,मधुकर पाटील ताबडतोब रवाना झाले आणि माहिती काढून दोघा आरोपींना अटक केली आहे.




