
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील जिल्हा परिषद शाळेत ६ रोजी बाल आनंद मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

तालुक्यातील वावडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत दि.६ जानेवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न झाला. व्यावहारिक ज्ञान वाढवणे व खरेदी-विक्री व्यवहार कसे करायचे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान केंद्राचे केंद्रप्रमुख छगन पाटील यांनी भूषविले. तसेच गावाचे प्रथम नागरिक सरपंच राजेंद्र प्रल्हाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र अभिमन पाटील, तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश माळी, शिक्षण प्रेमी चंद्रकांत वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच मान्यवरांनी फीत कापून स्टॉलचे उदघाटन केले. मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी देवून विद्यार्थ्यांसोबत खरेदी विक्रीचे व्यवहार केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पाकीजा पिंजारी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सुनीता पाटील, शिक्षकवृंद संगीता सोनार, अनिता बिऱ्हाडे, कविता खैरनार यांनी परिश्रम घेतले. यावेळी वसंत पाटील, दिनकर पाटील, गोरख पाटील, राजेंद्र पाटील, शीतल पाटील, सरला पाटील, किर्ती वानखेडे, रेखा वाल्हे, मोनाली धोबी आदी पालकवर्ग व गावातील ग्रामस्थ तसेच पालक वर्ग, माता-भगिनी, माध्यमिक विद्यार्थी वर्ग यांनी खरेदी विक्री व्यवहारात भाग घेवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.




