
अमळनेर:-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन केला.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व व सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी तिरंगा चौकात एकत्र येवून तेथून आव्हाड यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी आव्हाड यांच्याविरुद्ध मोठी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर पुतळा दहन करण्यात आले. यावेळी विहिपचे तालुकाध्यक्ष डॉ संजय शाह म्हणाले की, २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आणि मंदिराचा सोहळा संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. असे असताना श्रीराम यांच्या बद्दल आव्हाडांचे वक्तव्य निंदनीय आहे. साडेपाचशे वर्षांपासून ज्या अमृत सोहळ्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे, त्या सोहळ्याला गालबोट लावण्याचे काम आव्हाडांसारखे नेते करत आहेत. त्यांनी प्रभू रामाबद्दल केलेले अक्षम्य विधान खपवून घेतल्रे जाणार नसल्याचे ते म्हणाले.यानंतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आव्हाड यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली.
यावेळी विश्व हिंदु परिषद अमळनेरचे अध्यक्ष डॉ संजय शहा, राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे विजय पाटील,बजरंग दलचे मनोज मराठे, धर्मजागरण प्रमुख मुकेश परदेशी , शिव किरण बोरसे, किरण बोरसे, तसेच भाजपाचे पंकज भोई,चंद्रकांत कंखरे, मनोज शिंगाने यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

