
बांधकाम व कृषी क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल करणार गौरव…
अमळनेर:- तालुक्यातील बाम्हणे येथील रहिवासी असलेले प्रतीक पाटील यांना संगमनेर येथील संजीवनी फाउंडेशन तर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रतिक पाटील हे वास्तुश्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून बांधकाम आणि कृषी क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

संगमनेर येथील संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रत्येक वर्षी उद्योग, कृषी, आरोग्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
वास्तूश्री परिवार व चंद्रमंगल फार्मचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक पाटील यंदाच्या पुरस्काराचे युवा मानकरी ठरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी पुरस्काराचे वितरण संगमनेर येथे संपन्न होणार आहे. वास्तूश्री परिवार व चंद्रमंगल फार्मर प्रोड्युसर कंपनीने वास्तू-निर्मिती तसेच कृषी-उद्योग क्षेत्रांत केलेले उल्लेखनीय कार्य व समाजउपयोगी योगदान यासाठी सदर पुरस्काराने प्रतिक पाटील यांना गौरविण्यात येणार आहे. बांधकाम आणि जागतिक तापमानवाढ यांचा मेळ घालून वास्तूश्री परिवाराने डिजिटल इको होम ही अद्वितीय संकल्पना उदयास आणून अनेक पर्यावरणपूरक वास्तूंची निर्मिती केली आहे. शेती, माती, व संस्कृती यासाठी कटीबद्ध हे ब्रीदवाक्य घेऊन वास्तूश्री परिवाराने चंद्रमंगल ही शेतकरी संस्था उभी करून हळद प्रकिया हा कृषिपूरक उद्योग सुरु केला आहे. चंद्रमंगलच्या माध्यमातून वास्तूश्री परिवार ग्रामीण परिसरातील शेतकरी व व्यापारी यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिवचरित्र वाचल्यापासून स्व:कर्तृत्वावर स्वतःच स्वराज्य निर्माण करावं हा ध्यास मनी ठेऊन व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली व वास्तूश्री परिवार उभा केल्याचे प्रतीक पाटील यांनी सांगितले. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




