
शेतातून, नदी, नाले ओलांडून लोंढवे येथे विद्यालयात येत घेताय शिक्षण…
अमळनेर:- अमळनेर आगाराने तालुक्यातील खडके बस अचानक बंद केल्याने खडकेसह निसर्डी, वाघोदा येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना लोंढवे येथील स्व.आबासो एस.एस. पाटील विद्यालयात नदी, नाले, शेतातून पायवाट तुडवत जावे लागत आहे. सायंकाळी घरी जाण्यासाठी अंधार पडत असल्याने या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर हे विद्यार्थी शाळाच सोडून देण्याच्या मनस्थितीत असल्याने त्यांच्या होणाऱ्या या शैक्षणिक नुकसानीस अमळनेर आगार प्रशासन जबाबदार राहणार आहे.
अमळनेर आगारातून सुटणारी खडके बसमध्ये खडकेसह निसर्डी, वाघोदा येथील मुले आणि मुली या लोंढवे येथील विद्यालयात शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे त्यांचे शिक्षण चांगल्याप्रकारे सुरू होते. सकाळी आणि सायंकाळी त्यांना वेळेत शाळेत आणि घरी पोहचता येत होते. परंतु आगाराने अचानक बस बंद करून एक बस दुपारी बारा वाजता आणि सायंकाळी ७ वाजता येते. त्यामुळे या शालेय विद्यार्थ्यांसाठी त्या कोणत्याही कामाच्या नाहीत. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. तर ही मुले आणि मुली आता शेतातून काट्याकुट्यातून, नदी, नाल्यातून रस्ता तुडवत शाळेत पोहचत आहे. सायंकाळी मात्र पाच वाजता शाळा सुटत असल्याने त्यांना अंधारातूनच वाट काढत घरी पोहचावे लागत आहे.
पालकांनी आगार प्रमुखाची भेट घेऊनही दखल नाही…
या मुलांच्या पालकांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन समस्या सांगितले. परंतु त्यांनी फारसा प्रतिसाद न दिल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आगाराने ही बस का बंद केली, या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीस कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोज सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी पाच वाजता बस सोडावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांसह पालकांकडून करण्यात येत आहे.
बस सुरू करण्यासाठी आगाराला पत्र देणार…
अमळनेर आगाराने खडके बस बंद करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय केली आहे. शाळेकडून आगाराला पत्र देऊन बस पुन्हा सुरू करण्यासाठी विनंती केली जाईल. त्यावरही आगाराने दखल न घेतल्यास वरिष्ठांकडे त्याबाबत दाद मागितली जाईल.
– बाळासाहेब जीवन पाटील, मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय, लोंढवे




