
अमळनेर:- विद्यार्थ्यांना व्यवहारातील गणित कळावे, यासाठी अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे भेट देऊन त्यांंचे व्यवहार माहिती करून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह व उत्स्फूर्तपणा दिसून आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती देऊन विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करणे काळाची गरज झालेली आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील अनेक व्यवहार हे शेती विषयक बाबींवर अवलंबून आहेत. येथील शेती आणि माती अनेक शेतकऱ्यांना मजुरांना व व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अग्रेसर आहे. त्याअंतर्गत साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर येथील विद्यार्थ्यांना कृषी व्यवहारासंदर्भात माहिती व्हावी म्हणून शिक्षक डी ए धनगर यांनी मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्यमंत्री यांनी घोषित केलेले, माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक आधार पाटील यांच्या पूर्वसंमतीने शाळेचा अभ्यास दौरा संपन्न झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती कृषी भूषण सुरेश पिरण पाटील, संचालक नितीन पाटील, शरद पाटील, विजय पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील, व्यवस्थापक यु आर राठोड, वाघ, योगेश महाजन, सहसचिव सुनील सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कर्मचारी डी ए धनगर व जयेश मासरे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कर्मचारी प्रशांत राणे यांनी सर्व मार्केटचे व्यवहार समजावून सांगितले, यावेळी उपसभापती सुरेश पाटील नितीन पाटील, विजय पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील, डी ए धनगर यांची मनोगते झाली.
विद्यार्थ्यांना बाजार समिती परिसर फिरवताना व ओळख करून देताना नितीन पाटील विजय पाटील, सचिव राठोड व शिक्षक धनगर सर यांनी आडत्या म्हणजे काय? लिलाव म्हणजे काय? लिलावात बोली कशी लावली जाते? गुमास्ता म्हणजे काय? हमाल म्हणजे काय? काटापट्टी म्हणजे काय? अशा अनेक बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांनी त्या बाबी प्रत्यक्ष अनुभवल्या त्यामुळे त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर होऊन कृषी उत्पन्न बाजार समिती विषयी संपूर्ण माहिती झाली. संचालक नितीन पाटील यांनी मालाची ग्रेडिंग कशी होते त्या संदर्भात मार्गदर्शन केले. राठोड यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार कसे चालतात त्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. संचालक विजय पाटील यांनी सांगितले की मार्केट कमिटीच्या स्थापनापासून प्रथमच साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय भेट द्यायला आली व विद्यार्थ्यांच्या मनात कृषी विषयी जागरूकता निर्माण केली. त्याबद्दल उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी या ठिकाणी भेट देण्याचे कारण सांगितले. माजी संचालक डी ए धनगर यांनी इ-नाम या शेतकऱ्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्म विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. उपसभापती सुरेश पाटील यांनी शेती व्यवसाय किती फायद्याचा आहे होतो अशा पद्धतीने करावा यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या सर्व भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना ब्रोकर, ब्रोकरेज आर्थिक व्यवहार, शेतमालाला राज्यात कोणत्या पद्धतीने नेता येते, व्यापारी लायसेन्स कशा पद्धतीने काढावे लागते तसेच येथे खरेदी विक्रीचे व्यवहार कोण करते यासंदर्भात माहिती सखोल जाणून घेतली. पौगंडावस्थेतील मुलांना ही माहिती करून दिल्याबद्दल संस्थेचे सचिव संदीप घोरपडे अध्यक्ष हेमकांत पाटील शालेय समिती चेअरमन ऍड. अशोक बाविस्कर यांनी उपक्रमाचे कौतुक केले.




