
शिवाजीनगर भागातील गुरुदत्त मंदिरात अभ्यासिकेचा शुभारंभ…
अमळनेर:- ना भूक …ना तहान…फक्त जय श्रीराम जय श्रीराम म्हणत सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला. चहा ,पान टपरी ,भाजीपाला , मांस विक्री बंदीचा निर्णय घेत राम प्राणप्रतिष्ठा सोहळा वाजंत्री, भजन, कीर्तनच्या नादात संपन्न झाला मात्र दुसरीकडे शिवाजीनगर भागातील गुरुदत्त मंदिरात तरुणांसाठी अभ्यासिकेचा शुभारंभ करण्यात आला. या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एकीकडे तरुणाई जल्लोष करत होती तर गुरुदत्त मंदिरात राम प्राणप्रतिष्ठेच्या शुभमुहूर्तावर अमेय मुंदडा यांनी अभ्यासिकेचा शुभारंभ केला.यासाठी जयहिंद व्यायामशाळा व राजे शिवाजी मित्रमंडळाचे सहकार्य लाभले. यावेळी माजी नगरसेवक प्रताप शिंपी, जीवन पवार, बबलू पाटील, दीपक चौधरी, सुनील पाटील, लहू पाटील,कैलास बडगुजर हजर होते. शहरात सर्वांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले.
मोठ्या राममंदिरात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पवन शर्मा यांचे सुंदरकांड, अमोघ जोशी यांच्या गीत रामायणाचा कार्यक्रम झाला. अण्णा भाऊ साठे चौकात भावेश जैन यांनी तर विजय मारोती मंदिर, बाजार समिती, लाल बाग शॉपिंग कॉम्प्लेक्स याठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता. माजी आमदार शिरीष चौधरी गटाने मोटरसायकल रॅली काढली. भगवा चौकात व मोठ्या राम मंदिरात मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले.
एलआयसी कॉलनीसह शहरातील विविध भागात अंगणात सडा टाकून रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या. दिवसभर रामधून, भजन, गीतांचा कार्यक्रम झाला.




