
पालिकेतर्फे २३ ते ३१ जानेवारी पर्यंत सर्वेक्षण मोहीम…
अमळनेर:- तालुक्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण मोहीमेला २३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. सुमारे ५२० कर्मचारी अमळनेर तालुक्याचे सर्वेक्षण करणार आहेत. एका कुटुंबाला १५० पेक्षा जास्त प्रश्नांची माहिती भरावी लागणार आहे.

उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार सुराणा, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या उपस्थितीत प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण पार पडले असून २३ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण संपूर्ण तालुक्यात राबविले जाणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य स्तरावरून कारवाई करायला सुरुवात झाली असून त्याअंतर्गत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करायला सुरुवात झालेली आहे. अमळनेर शहरातील सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक यांची टीम तयार करण्यात आली असून २२ रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात शहराची बैठक संपन्न झाली. तर जी एस हायस्कूल मध्ये ग्रामीण भागाची बैठक झाली. ग्रामीण भागात ३५० कर्मचारी तर शहरी भागात १७० कर्मचारी सर्वेक्षण करणार आहेत. यावेळी अभियंता प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, अभियंता अमोल भामरे तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या कामांची सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या पर्यवेक्षकांना अचूक माहिती सांगून सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले. तालुक्यातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण होणार आहे. त्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील घरे आढळल्यास १५० प्रश्नांची उत्तरे ऑनलाईन भरले जातील. दुसऱ्या जातीचे अथवा प्रवर्गाचे घर आढळल्यास फक्त जातीची माहिती भरून त्याचे सर्वेक्षण होणार नाही. सर्वेक्षकाला १० हजार रुपये मानधन मिळणार आहे.

