
वन विभागाच्या पाहणीत आढळल्या बिबट्याच्या पाऊलखुणा…
अमळनेर:- तालुक्यातील रूंधाटी परिसरात मेंढपाळांच्या कळपावर सोमवारी रात्री बिबट्याने हल्ला केल्याने एक मेंढी ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान वन विभागाने पाहणी केली असता रुंधाटी शिवारात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत, त्यामुळे शेतकरी आणि मजूर वर्गास सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रुंधाटी गावाजवळ मेंढपाळाच्या वाड्यावर मेंढी कळपावर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केल्याने सोमवारी रात्री एक मेंढी ठार झाल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. रुंधाटी, मुंगसे, मठगव्हाण, गंगापूरी शिवारात शेतकरी रात्री शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जात असतात. मात्र या घटनेमुळे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री गस्त घातली होती मात्र अंधारात काहीसे समजले नव्हते,मंगळवारी सकाळी पुन्हा वन विभागाचे अधिकारी शशिकांत देसले, वनपाल पी जे सोनवणे, रामदास वेलसे आणि वनमजुर यांनी गस्त घातली असता बिबट्याच्या पाऊल खुणा आढळल्या आहेत. नागरिकांना सावध राहण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.




