अमळनेर:- पुणे येथील ललित कलाकेंद्रात सुरू असलेल्या नाटकातील कलाकारांवर झालेल्या हल्ल्याचे अमळनेरात पडसाद उमटले असून काँग्रेस तसेच अनेक सामाजिक संघटनांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देत घटनेचा निषेध केला आहे.
पुणे येथील ललित कला केंद्रात अमळनेरच्या भावेश पाटील दिग्दर्शित “जब वी मेट” या नाटकाचा प्रयोग सुरू असतांना अभाविपच्या काही कार्यकर्त्यांनी तो कार्यक्रम बंद पाडला तसेच महिला कलाकारांचा विनयभंग तसेच शिवीगाळ केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यात अमळनेरची भूमिका घोरपडे या महिला कलाकाराचा देखील समावेश होता.
सरकारच्या यंत्रणेला हाताशी धरून अभाविप कार्यकर्त्यांना मोकळं सोडून नाटकातील कलाकारांवरच उलट गुन्हा दाखल केल्याने त्याचा अमळनेरात निषेध करण्यात आला. देशात व राज्यात हुकूमशाहीचे सरकार असल्याचे निवेदनात म्हटले असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,शहराध्यक्ष मनोज पाटील,जेष्ठ नेते डॉ.अनिल शिंदे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ,संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, डी.ए. धनगर, महेश पाटील,सचिन वाघ, प्रा.अशोक पवार,रणजित पाटील, बी.के.सूर्यवंशी,राजू फाफोरेकर, नयना पाटील यासह काँग्रेस तसेच अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.