
राज्यस्तरीय नामदार चषकाचे झाले जल्लोषात उद्घाटन…
अमळनेर:- अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राला वैभवशाली परंपरा असून या पूढे देखील ही उज्ज्वल परंपरा जपून मतदारसंघाच्या क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान देणार असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांनी केले.अमळनेर क्रिकेट असोसिएशन आयोजित नामदार चषकाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १० रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उदघाटन नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यात विजेत्या संघाला २ लाख तर उपविजेत्या संघाला १ लाखांचे बक्षीस मिळणार आहे. यावेळी व्यासपीठावर खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, संचालक योगेश मुंदडा, विनोद पाटील,विश्वस्त वसुंधरा लांडगे, प्राचार्य ए.बी.जैन,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील,बाजार समिती सभापती अशोक पाटील,राजेश पाटील, संजय पाटील,प्रताप शिंपी, शिवाजी पाटील,प्रवीण जैन, ऍड.व्ही.आर.पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना.अनिल पाटील यांनी महाविद्यालयीन जीवनातील त्यांच्या क्रिकेटवरील प्रेमाचा आवर्जून उल्लेख करत अमळनेर संघात स्थान मिळत नसल्यामुळे ते चोपडा संघाकडून खेळत असल्याचे सांगितले. अमळनेरातुन अनेक तरुण खेळाडू पुढे येत असून फक्त क्रिकेटच नव्हे तर क्रीडा क्षेत्राला चालना देणार असून तालुका क्रीडा संकुलासाठी ३ कोटींचा निधी मिळाला आहे तर अजून ३ कोटींचा निधी प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक संजय पाटील यांनी केले.
पहिल्याच सामन्यात अमळनेरची बाजी…
अमळनेर विरुद्ध संगमनेर या पहिल्या सामन्याची नाणेफेक ना.अनिल पाटील यांच्या हस्ते करून स्पर्धेला सुरवात झाली.या सामन्यात अमळनेरच्या संघाने ६८ धावांनी संगमनेर संघाचा पराभव केला.११ रोजी सकाळच्या सत्रात जैन इरिगेशन विरुद्ध दिपनगर (भुसावळ) तर दुपारच्या सत्रात अमरावती विरुद्ध के.बी.क्लब (अमळनेर) यांच्यात सामना रंगणार आहे.




