
अमळनेर:- शहरातील महिला व्यापारी बहुउद्देशीय संस्थेचा मेळावा १२ फेब्रुवारी रोजी जी एस हायस्कुलच्या हॉलमध्ये उत्साहात पार पडला.

अमळनेर शहरात प्रथमच महिलांनी महिलांसाठी हस्तकला घरगुती, उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संस्था स्थापन केली असून या संस्थेची सर्व कामे महिलांच्या स्थापन केलेल्या कमिटी मार्फत चालविण्यात येणार आहे. सुरूवातीला सर्व सामान्य, काबाडकष्ट करणार्या महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि विजया जैन यांनी कार्यकारणीतील सर्वांचा परिचय करून दिला. संस्थेच्या प्रमुख शितल सांवत यांचे सह मंचावर जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील, सुलोचना वाघ, महिला मंचच्या अध्यक्षा डाॅ. अपर्णा मुठे या उपस्थित होत्या. संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक आरती रेजा यांनी केले तर भारती गाला यांनी संस्थेचा कारभार ज्या तत्वांवर चालेल व त्याचे ध्येये यांची विस्तृत माहिती दिली.त्यात त्यांनी संस्थेचा उद्देश व कार्य या विषयी माहिती दिली. महिलांना गृह उद्योगाद्वारे आत्मनिर्भर होता येईल त्यात त्यांना वडे, पापड, शेवया, मसाले,राजगीरा लाडु, फराळाचे पदार्थ, इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ शिवण कला, हस्तकलेने बनविलेल्या विविध वस्तु, ब्युटी पार्लर तसेच इतर उत्पादने निर्मिती साठी कर्ज सबसीडी कुठे व कशी मिळते ? कच्चामाल कुठे मिळतो ? तयार मालाला बाजारपेठ कुठे व कशी उपलब्ध होते ? या सारख्या प्रश्नांवर मार्गदर्शन या संस्थेमार्फत करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन प्रबोधिनी पाटील यांनी तर आभार प्रतिभा पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधीकारी आरती रेझा,प्रिया रजाळे, मनिषा भांडारकर, विजया पाटील, प्रबोधीनी पाटील, फरिदा बोहरी, संगीता वाघमोडे, वैशाली निकम, विजया जैन, पुजा पाटील यांनी परिश्रम घेतले.




