
व्हिडिओ झाला व्हायरल, मुख्याधिकारी नेरकर यांनी बजावली शो-कॉज नोटीस…
अमळनेर:- येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख हे कार्यालयातच मद्यप्राशन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून याप्रकरणी काल रात्रीच मुख्याधिकारी यांनी शो कॉज नोटीस बजावल्याची माहिती आहे.
अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख नितीन खैरनार यांचा हा व्हिडिओ असून ह्या व्हिडिओ मुळे आतापर्यंत चांगल्या कामांसाठी चर्चेत असणाऱ्या नगरपरिषदेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. कर्तव्यावर असताना कार्यालयाचा दरवाजा लावून सदर विभागप्रमुख दारू ढोसत असल्याचा हा व्हिडिओ असून यावर किती अंधाधुंद कारभार सुरू आहे याची प्रचिती येते. व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या तरुणास दारूचा ग्लास हातात धरून ‘तुला काय करायचं ते कर, कुठ व्हिडिओ टाकायचा तो टाक’ अस बिनधास्त सांगताना दिसत आहे. तसेच टेबलच्या ड्रॉवरमध्ये दारूच्या बाटल्याचे खोके दिसून येत असून सर्वांच्याच राजीखुशीने हा प्रकार सुरू असल्याचे लक्षात येते. सदरील व्हिडिओ मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी ही पाहिला असून रात्रीच शो कॉज नोटीस दिल्याची माहिती आहे. मात्र फक्त कागदोपत्री घोडे नाचवले जाणार की मुख्याधिकारी यांच्याकडून ठोस पावले उचलली जाणार ? याकडे लक्ष लागून आहे.व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाने या विभागप्रमुखावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याचे समजते.
प्रतिक्रिया….
सदर कर्मचाऱ्याला शो कॉज नोटीस बजावली असून कार्यालयीन प्रक्रियेनुसार त्यांच्या उत्तरानंतर कारवाई करण्यात येईल.
– तुषार नेरकर, मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद






