
अमळनेर:- पारोळा तालुक्यातील मयत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तिघा संशयितांची येथील जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील विवाहिता पूनम जगदिग बेलदार हिने २७ फेब्रुवारी २०२० रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.घटनेनंतर पुनमची आई पुष्पाबाई संजय कुमावत (रा.मुंदखेडे) यांनी पारोळा पोलीस ठाण्यात पुनमचे पती, सासरे व दिर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तिघांकडून मयत पुनमला वारंवार शारीरिक, मानसिक तसेच हुंड्याचे पैसे आणावे म्हणून तिला अनेकवेळा माहेरी पाठविण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले होते.

या तीनही आरोपींविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०४-ब,३०६,४९८-अ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली होती. सदर खटल्याच्या चौकशीवेळी अमळनेर सेशन कोर्टात सरकार पक्षातर्फ़े फिर्यादी पुष्पाबाई कुमावत,मयत पूनमचे वडील संजय कुमावत,मामा नितीन बेलदार,आत्या योगिता कुमावत हे साक्षीदार तपासण्यात आले मात्र यात साक्षीदारांच्या जबाबीतील तफावती, अविश्वासार्हता तसेच तफावतीतील त्रुटी या बाबींचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.गायधनी यांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.आरोपींतर्फे ऍड. निरंजन ढाके व प्रसाद ढाके यांनी काम पाहिले.





