
ग्रीन बिल्डिंगसाठी ग्रामविकास विभागाची मंजुरी, मंत्री अनिल पाटील यांची माहिती…
अमळनेर:- तालुका पंचायत समितीच्या पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंग साठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने १० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
यापूर्वी ११ कोटींची महसूल इमारत, १४ प्रशासकीय इमारत, १० कोटींची एस टी आगार कार्यशाळा आणि आता पंचायत समितीची १० कोटींची नवीन इमारत होणार असल्याने शहराचे स्वरूप पालटणार आहे. विशेष म्हणजे या सर्व इमारती धुळे चोपडा रस्त्याला लागून एकाच बाजूला जवळजवळ असल्याने नागरिकांची सोय होणार आहे.
अमळनेर पंचायत समितीची इमारत १९६१ साली बांधण्यात आली होती. ५४ वर्षे झाल्याने इमारत जीर्ण झाली होती. तसेच सुविधा अपूर्ण पडत होत्या. म्हणून मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हापरिषदेच्या मार्फत नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा सुरू केला होता. विशेष म्हणजे शासनाने प्रशासकीय मान्यता देताना पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ग्रीन बिल्डिंग संकल्पना अमलात आणून नैसर्गिक प्रकाश योजना, वायुवीजन, पाण्याच्या व विजेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरण, जास्तीत जास्त पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य व साधन सामग्रीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुन्या इमारतीत महिला प्रसाधनगृह नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. नवीन इमारतीत महिला प्रसाधनगृह आणि विश्रांतीकक्ष, अपंगांसाठी विविध सुविधा तसेच रॅम्प रेलिंग करण्यात येणार आहे.
पंचायत समितीची नवीन इमारत जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या जागेत होणार आहे. या मंजुरीबद्दल अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.
प्रतिक्रिया…
अमळनेर बसस्थानकाच्या आजूबाजूला सर्व कार्यालये उभारणी सुरू झाल्याने ग्रामीण भागातून अथवा बाहेरगावाहून येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला एकाच वेळी सर्व कामे करताना त्रास होणार नाही. तसेच वेळ आणि रिक्षा किंवा इतर खर्च वाचणार आहे.
– अनिल पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री




