अमळनेर:- शहरातील फरशी रोडवरील रहिवाशी विशाल विजय सोनवणे याच्यावर केलेली एमपीडीए कारवाई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. आरोपी हा खतरनाक व समाजात अडथळे निर्माण करणारा असल्याचा जिल्हा दंडाधिकारी यांनी काढलेला निष्कर्ष चुकीचा असल्याचे आदेशात म्हटले आहे.
विशाल सोनवणे हा खतरनाक असून त्याच्यापासून समाजात अडथळे निर्माण होतात म्हणून त्याच्याविरुद्ध एमपीडीए प्रमाणे कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. जिल्हादंडाधिकारीनी हा प्रस्ताव मंजूर करून १५ मार्च २३ रोजी विशाल यास नागपूर कारागृहात रवाना केले होते. त्याविरुद्ध विशाल सोनवणे यांनी ऍड हेमंत साळुंखे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. विशाल याच्या विरुद्ध केलेली कारवाई ही राजकीय प्रभावातून झालेली आहे. व दाखल झालेल्या गुन्ह्यात विशाल यास न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. सहा महिन्यात विशाल यांच्याकडून कोणताही समाजघातक कृत्य झालेले नाही. त्यामुळे त्याला खतरनाक म्हणणे चुकीचे आहे. तो खतरनाक असता तर पोलिसांनी त्याच्या जामीन विरुद्ध हरकत का घेतलेली नाही. असा युक्तिवाद वकिलांनी केला. त्याच प्रमाणे ज्या गोपनीय साक्षीदारांनी साक्ष दिली आहे त्यांना विशाल याने केलेल्या घातक कृत्यांचे वेळ आणि ठिकाण सांगता आलेले नाही यावरून जिल्हा दंडाधिकारिनी काढलेले निष्कर्ष चुकीचे आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेले एमपीडीएचे आदेश उच्च न्यायालयाचे न्या संजय देशमुख व न्या आर जी अवचट यांनी रद्द करून विशाल याची कारागृहातून मुक्तता केली आहे.