
अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल, संशयित महिलांचे सीसीटीव्हीत झाल्या कैद…
अमळनेर :- शहरातील भर बाजारपेठेत असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून सेवानिवृत्त असलेल्या कर्मचाऱ्याच्या पिशवीतून सुमारे सव्वा लाख रुपये दोन महिलांनी चोरून नेल्याची घटना घडली असून अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाबूलाल शंकरसिंग गिरासे (रा.कंळबे ता.अमळनेर) हे दि.११ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र् शाखेत निवृत्ती वेतन काढण्यासाठी आले होते.त्यांनी त्यांच्या खात्यातून सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये काढून ते सोबत आणलेल्या पिशवीत ठेवून पासबुक भरण्यासाठी रांगेत उभे राहिले. थोड्यावेळात पिशवी बघितली असता त्यात काढलेली रक्कम आढळून आली नाही.इतर शोधाशोध केली असता पैसे आढळून न आल्याने याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांना सदर घटना सांगितली असता त्यांनी बँकेत बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता शेजारी उभ्या असलेल्या दोन महिला पिशवीतून पैसे चोरतांना दिसून येत आहेत. याबाबत अमळनेर पोलीसात दोन्ही अनोळखी महिलांविरुद्ध भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक जयंत सपकाळे करीत आहेत.




