
अमळनेर:- भारत दूरसंचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएल ने कात टाकणे सुरू केले आहे. अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात १७ बीएसएनएलचे फोर जी नेटवर्क टॉवर उभारणीसाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारीकडून मोफत जागा देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना आता फास्ट नेटवर्क आणि उत्तम सुविधा मिळणार आहेत.
भारत दूरसंचार निगम लिमिटेड या शासकीय यंत्रणेची परिस्थिती बिघडल्याने कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती देण्यात आली होती. यंत्रणा आधुनिक होत नव्हती. शासनाकडून मदत मिळत नव्हती. लँडलाईन फोन बंद पडत होते. सेवा देण्यासाठी कर्मचारी कमतरता होती. तर मोबाईल नेटवर्क थ्री जी मिळत असल्याने ग्राहक बीएसएनएल सिम घ्यायला नकार देत होते. किंवा कंपनी बदलवून घेत होते. खाजगी कंपन्या ५ जी नेटवर्क व ठिकठिकाणी टॉवर देत असताना बीएसएनएल कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. मात्र आता बीएसएनएल ने पुन्हा नव्याने उभारी घेतली आहे. केंद्र शासनाकडून अनुदान व मदत मिळू लागली आहे. बीएसएनएलने कात टाकून ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अमळनेर तालुक्यात एकलहरे, बामणे, जैतपिर, भोरटेक, कलाली, आंचलवाडी, निसर्डी, खडके, वाघोदे, दापोरी, गंगापुरी, खापरखेडा प्र डांगरी, खापरखेडा प्र जळोद, खेडी प्र डांगरी, जुनोने, आटाळे, आनोरे या गावांना ४ जी नेटवर्क चे टॉवर उभारले जाणार आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रत्येक गावाला २०० चौरस मीटर जागा टॉवर उभारणीसाठी बीएसएनएलला मोफत दिल्याने बीएसएनएलने उभारी घेतली आहे. तर खापरखेडा प्र जळोद येथे नारायण पाटील यांनी २०० चौ मी जागा दान दिली आहे.
विशेष म्हणजे याठिकाणी सोलर पॅन, जनरेटर ,बॅटरी , पॉवर प्लांट , ४ जीबीटीएस साहित्य लावण्यात येणार आहे. यासाठी दूरसंचार महाप्रबंधक महेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ,उपमंडल अभियंता पंकज रायसिंघानी परिश्रम घेत आहेत. ज्याठिकाणी कोणतेही नेटवर्क टॉवर नव्हते त्याठिकाणी बीएसएनएल नेटवर्क टॉवर उभारले जाणार आहेत. आतापर्यंत दापोरी, जैतपिर, खापरखेडा प्र जळोद या तीन ठिकाणी टॉवर उभारले गेले आहेत.
प्रतिक्रिया…
शहरात सर्वत्र तांब्याची तार असलेल्या वायर काढून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात येणार आहे. तर ज्यांच्याकडे जुने लँडलाईन कनेक्शन आहे त्यांना इंटरनेटचे राऊटर मोफत देण्यात येणार आहे.
:- पंकज रायसिंघानी, उपमंडळ अभियंता, अमळनेर




