
धार्मिक झेंडे काढणे नागरिकांना सक्तीचे नाही:- उपविभागीय अधिकारी…
अमळनेर:- आचारसंहिता निमित्त राजकीय झेंडे ,पोस्टर अथवा बॅनर काढून घेतले जात आहेत. मात्र धार्मिक झेंडे काढणे नागरिकांना सक्तीचे नाही ते स्वेच्छेने काढू अथवा लावू शकतात अशी माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यानंतर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी महसूल, पंचायत समिती, पोलीस प्रशासन, नगरपालिका सह सर्व विभागांची बैठक घेऊन आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक विभागाचे कर्मचारी शहरात तथा ग्रामीण भागात फिरून सार्वजनिक ठिकाणी असलेले राजकीय पक्षांचे पोस्टर्स, झेंडे, बॅनर्स, विकासकामांचे फलक काढून घेत आहेत. तसेच नागरिकांच्या घरावरील झेंडे, चिन्ह देखील काढण्याच्या सूचना देत आहेत. मात्र हे करत असताना पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना रामाचा फोटो असलेले किंवा हिंदू धर्माचा भगवा झेंडा, मुस्लिम धर्माचा हिरवा झेंडा देखील काढण्याच्या सूचना देत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता. काहींनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेतली असता धार्मिक झेंडे काढण्याची सक्ती नाही असे खेडकर यांनी सांगितले.
दरम्यान राजकीय व्यक्तींनी लावलेले पथदिवे अथवा हायमॉस्ट लॅम्प वर त्यांच्या नावाचे फलक व राजकीय पक्षाचे चिन्ह असल्याने ते झाकण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. उंच शिड्या आणून खांबावर चढणे आणि त्याला कागद किंवा कापड चिकटवणे यासाठी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पोलिस निरीक्षक विकास देवरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर व त्यांचे सहकारी डोळ्यात तेल घालून कानाकोपऱ्यात, बारीक गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत.




