
भुयारी गटारीच्या कामामुळे झाला वांदा, तक्रारी करूनही ठेकेदाराचे दुर्लक्ष…
अमळनेर:- शहरातील नवीन गलवाडे रोड,मुंदडा नगर 2 च्या उत्तरेस असलेला एक रस्ता प्रचंड दुरावस्थेमुळे सुमारे दोन वर्षांपासून वाहतुकीसाठी बंद असून भुयारी गटारीच्या कामामुळेच या रस्त्याची दुरावस्था होऊन त्यावर काँक्रीटीकरण व गटारकाम मात्र झाले नसल्याची ओरड नागरिकांत होत आहे.
यासंदर्भात अनेकदा लेखी तक्रारी करूनही काही उपयोग होत नसून,पालिका तथा भुयारी गटारीचा ठेकेदार लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.या परिसरात असलेले केले नगर, हरीओम नगर, श्रद्धा नगर, प्रसाद नगर मध्ये जाण्यायेण्यासाठी हा एकमेव मार्ग असून भुयारी गटारीच्या ठेकेदाराने हा रस्ता दोनदा खोदला व बुजला आहे. मात्र त्यावर कोणतीही डागडुजी न करता तसाच राहु दिल्याने रात्री तर सोडाच दिवसा देखील येथून वापरणे शक्य होत नाही.विशेष म्हणजे केवळ 350 मीटर लांबीचा हा रस्ता असताना हेतुपुरस्कर पक्का होत नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे.भुयारी गटारीच्या कामानंतर आजूबाजूला असलेले रस्ते डांबरीकरण झालेले असताना हा महत्वपूर्ण रस्ता तसाच सोडून देण्याचे कारण काय ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.सदर रस्ता अतिशय धोकेदायक झाला असून यामुळे अनेकदा अपघातही होत असतात,अनेकदा वाहनेही येथे फसतात येणाऱ्या काळात पावसाळ्याच्या दिवसात परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने आतातरी पालिका तथा संबंधित विभागाने नागरिकांचा अंत न पाहता या रस्त्याचे डांबरीकरणं किंवा काँक्रीटीकरण करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.




