सोनार अँड सराफ असोसिएशनच्या नूतन भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न..
अमळनेर:- अनेक अडचणी सोडविल्यानंतर येथील दि सोनार & सराफ असोसिएशनची स्वतःची वास्तू अमळनेरात उभी राहणार याचा मला मनस्वी आनंद होत असून सदर वास्तू अतिशय चांगली व उत्कृष्ठ बांधा,चांगल्या कामाला मदतीचे हात नक्कीच मिळतात अशी भावना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली.
सोनार अँड सराफ असोसिएशनच्या नूतन भवनाचा भूमिपूजन सोहळा मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते नुकताच पार पडला, यावेळी ते बोलत होते. सराफ बाजार येथे हे नूतन भवन उभारले जात असून आजोबा व पणजोबांनी घेतलेल्या या भव्य जागेत त्यांची लेकरे नूतन भवन बांधत असून पुण्यानंतर केवळ अमळनेर येथेच असोसिएशनची स्वतःची जागा असल्याचे असोसिएशनचे विश्वस्त मुकुंद विसपुते यांनी सांगत याठिकाणी समाज मंदिर देखील बांधले जाईल असे सांगितले. तसेच मंत्री अनिल पाटील यांनी न भूतो न भविष्यती असा विकास या तालुक्याचा केला असून इतके सुगीचे दिवस या तालुक्याला येतील असे स्वप्नात देखील वाटले नव्हते असे आवर्जून सांगत मंत्री पाटील यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. सुरवातीला प्रास्तविक असोसिएशनचे अमळनेर अध्यक्ष संदीप सराफ यांनी केले.
सुरवातीला असोसिएशन तसेच विश्वस्त मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने मंत्री पाटील यांचा विशेष सत्कार करत अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली.
धरणात पाणी अडल्यावर शेतकरी व व्यापारीही समृद्ध होणार…
अध्यक्षीय मनोगतात मंत्री पाटील पुढे म्हणाले की, सोनार असोसिएशनच्या नूतन भवनामुळे अमळनेर नगरीचा माईल्ड स्टोन अजून पुढे सरकला आहे, याठिकाणी नरहरी मार्ग असे नामकरण झाले असले तर ते अधिकृतरित्या झाले पाहिजे ही इच्छा आहे,एवढेच नव्हे नरहरी महाराजांचे स्मारकही येथे झाले पाहिजे,पुढील काळात याबाबतीत नक्की निर्णय घेऊ. दोन वेळा मी विधानसभेत पराभूत झालो पण तिसऱ्यांदा तुमच्या सर्वामुळे संधी मिळाली, आणि अजित दादाच्या कृपेने राज्याच्या 29 जणांच्या मंत्री मंडळात अमळनेरला स्थान दिले हे भाग्य आहे,यामुळे कुठेतरी तालुका बदलत असून बदलते चित्र जनतेच्या डोळ्यासमोर आहे, दगडी दरवाजाचा कठीण प्रश्न आज सुटला आहे,शहरात 70 ते 80 टक्के रस्ते मंजूर होऊन प्रत्यक्षात कामही सुरू झाले आहे. पुढील पिढ्या सक्षम करायच्या असल्याने उद्योग व व्यापाऱ्याला चालना देण्याचा प्रयत्न असून येणाऱ्या काळात धरणाची प्रचंड प्रगती झालेली दिसेल, आजच तुम्ही धरणावर जाऊन पहा त्याची उंची आकाशाकडे भिडताना दिसत आहे, एकदा पाणी अडलं की शेतकरी समृद्ध झालाच समजा आणि शेतकरी समृद्ध झाला तर आपले व्यापारी व व्यावसायिक समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
यावेळी मंचावर धुळे येथील पदाधिकारी अजय नाशिककर,शक्तीशेठ मैती, सरदारमल चौधरी, जळगाव येथील गौतमचंद लूनिया ,दिलीप लुंनीया, पारोळा येथील योगेश सोनार,विष्णू बापू सोनार, चाळीसगाव येथील निलेश सराफ,अमळनेर येथील संस्थेचे ट्रस्टी मदन सराफ, मुकुंद विसपुते, राजेंद्र वर्मा, संदीप सराफ, मिलिंद भामरे यासह बाहेर गावातील असंख्य प्रतिष्ठित व्यापारी व सराफ व्यावसायिक उपस्थित होते.सूत्र संचालन किशोर अहिरराव व दिलीप दाभाडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र भामरे, योगेश सोनार, सचिव निलेश देवपूरकर, सहसचिव नंदकुमार वाघ, खजिनदार प्रशांत सोनार तसेच अतुल सोनी अशोक देवरे,गिरीश वर्मा,नरेंद्र भामरे,किरण सोनार, कपिल विसपुते,यश वर्मा व अथर्व विसपुते यांनी परिश्रम घेतले.