मांडळ येथील चार ग्रा.पं.सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले अपात्र…
अमळनेर:- राजकीय वादामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांना निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकारी यांनी अपात्र करण्याचे आदेश दिले आहेत.
जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर चार सदस्यांनी दिलेल्या मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नसल्याची तक्रार मांडळ येथील दीपक नंदवे यांनी केली होती. याबाबत संबंधित ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पवार, कल्पनाबाई भाऊराव पाटील, वेणुबाई पांडुरंग भील, सुरेखाबाई भीमराव पाटील यांनी कोविड आजाराच्या बिकट परिस्थितीमुळे सदर खर्च सादर करण्यास उशीर झाल्याचे कळविले होते. मात्र महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ च्या तरतूदीचा भंग झाल्याचे लक्षात आल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वरील चार ही ग्रामपंचायत सदस्य अपात्र असल्याबाबत निर्वाळा दिला आहे.